पुणे – ‘साहेब इलेक्‍शन ड्युटीवर गेलेत’

इलेक्‍शन ड्युटीच्या नावाखाली कामचुकार पणा; नागरिकांची गैरसोय ?

मांजरी – सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आणि महसूल विभागात एरवी अधिकारी-कर्मचारी जागेवर सापडणे मुश्‍किल असते. त्यात पुन्हा आता बहुतेक कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी जुंपले गेल्यामुळे कोणत्याही कार्यालयात गेल्यावर साहेब इलेक्‍शन ड्युटीवर गेलेत असे उत्तर मिळत आहे. यामुळे कामचुकारांना पर्वणी लाभली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात 23 आणि 29 असा दोन टप्प्यात मतदान होत असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महसूल, पालिका क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी काही कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांचा काही दिवस त्या-त्या विभागाशी अजिबात संबंध नसेल. मात्र, बहुतेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले गेले आहे. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामे करून आपलेदेखील काम सांभाळणे अभिप्रेत असते, अशी माहिती सूत्रांनी दिली तर अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांना निवडणूकीचे काम देण्यात आले नाही. मात्र हेच अधिकारी आपले काम टाळण्यासाठी आपण इलेक्‍शन ड्युटीवर असल्याचे सांगत आहेत.

निवडणूकीची कामे वगळता इतर कामे करणारे कर्मचारी सध्या कार्यालयातून गायब असतात. इलेक्‍शन ड्यूटीच्या ट्रेनिंगला साहेब गेलेत, असे उत्तर बहुतेक कार्यालयांमधून दिले जाते. तर कामासाठी कार्यालयात गेलेल्या व्यक्तीने संबंधित अधिकारी यांना संपर्क साधला असता आपण इलेक्‍शन ड्युटीवर असल्याचे एसएमएस करून पूर्ण जबाबदारी झटकली जात आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.