पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात आंब्याची पहिली आवक झाली आहे. रविवारी (दि. १२) देवगड येथून केशर आंब्यांची पहिली पेटी दाखल झाली. सव्वा पाच डझनाच्या पेटीला लिलावात तब्बल ३१ हजार रुपये भाव मिळाला. हा भाव मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. व्यापारी अनिरुद्ध उर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावर ही पेटी दाखल झाली. देवगड येथील शेतकरी साद मुल्ला यांच्या बागेतून या पेटीची आवक झाली. साई आंबा सर्व्हिसचे प्रणित मांजरेकर यांनी ही पेटी पुण्यात आणली. व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी लिलावात पेटीची खरेदी केली.
त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा मिसाळ, बाजार समिती फळे व भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे, अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर, आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गौरव घुले, आडते असोसिएशनचे संचालक रोहन जाधव, अंकुश वाडकर, राजु पतंगे, राजु भोले, किशोर लडकत, संजय वखारे, प्रकाश पंजाबी, शरद कुंजीर, बलभिम माजलगावे यांच्यासह अन्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याविषयी बाप्पू भोसले व बलभिम माजलगावे म्हणाले, दरवर्षी येथील बाजारात हापूसची आवक पहिल्यांदा होत असते. मात्र, यंदा केशरची झाली आहे. केशरची नेहमीच्या तुलनेत लवकर आवक झाली आहे. हवामान बदलामुळे यंदा हापूस थोडा विलंबाने येणार आहे. १५ मार्चपासून आंब्यांची नियमित आवक सुरू होईल. आंब्यांचा दर्जा यंदा चांगला राहण्याचा अंदाज आहे.
केशर हा गुजराथचा माल. मात्र, मागील काही वर्षात कोकणात केशरची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोकणातील हवामान आंब्यास पोषक आहे. त्यामुळे केशरचे उत्पादन वाढणार असून, परिणामी, आवकही वाढणार आहे. यंदा तर हापूसच्या आधीच केशरची आवक झाली आहे.