हडपसर – मतदारसंघातील पोलीस स्टेशन ही नागरिकांच्या सुरक्षेची केंद्रबिंदू आहे. वाढत्या लोकसंख्येच्या सुरक्षिततेचा मोठा ताण त्यावर येत होता. मी महिला व ज्येष्ठांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आलो आहे. त्यासाठी हडपसर, वानवडी, कोंढवा आदी पोलीस स्टेशनचे विभाजन करून फुरसुंगी व काळेपडळ ही दोन नवीन पोलीस स्टेशन मंजूर करून आणली, नागरिकांच्या सुरक्षिततेला माझे प्राधान्य असल्याचे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी सांगितले.
मांजरी बुद्रुक परिसरात दोन वर्षांपूर्वी कोयता गँगच्या उपद्रवामुळे सामान्य नागरिकांना अनेकदा दहशतीशी सामना करावा लागला आहे. त्याबाबत चेतन तुपे यांनी विधानसभेमध्ये सतत आवाज उठवून पोलीस यंत्रणेचे लक्ष या गंभीर प्रकाराकडे वेधले. पोलिसांनी तत्काळ कोयता गँगच्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे.
चेतन तुपे म्हणाले की, नागरिकांची सुरक्षितता विचारात करता हडपसर, कोंढवा, वानवडी, मांजरी येथील महत्त्वाच्या भागांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे उभारून पुढील काळामध्ये ही सुरक्षा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये पोलीस काका ही संकल्पना राबवून विद्यार्थी व युवतींना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक तपास यंत्रणेसाठी पाठपुरावा करण्यात येईल.
दरम्यान, उमेदवार चेतन तुपे यांनी सय्यदनगर परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक फारूक इनामदार, अशोक कांबळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मी आजपर्यंत कधीही कोणत्याही गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो नाही. अधिकाऱ्यांना एखादे विशिष्ट काम करण्यासाठी कधीही दबाव टाकला नाही. पोलिसांनी नागरिकांचे मित्र म्हणून राहावे, यासाठी माझा कायम पुढाकार राहिला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, याची खबरदारी घेत आलो आहे.” – चेतन तुपे, उमेदवार, महायुती हडपसर विधानसभा