बडे म्होरके तुरुंगात,अल्पवयीन मुले मैदानात
पुणे : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मागील काही वर्षांत शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना “मोक्का’ लावण्याचा धडाका सुरू आहे. बहुतांश सराईत गुन्हेगारी टोळ्या कारागृहात आहेत. मात्र, ही कारवाई करताना “मोक्का’चे साइड इफेक्ट काय असतील, याचा अभ्यास केला गेला नाही का? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तसेच त्यादृष्टीने कोणतेही नियोजन केले गेले नाही. मात्र, आता या कारवाईचे परिणाम हळूहळू पुढे येत आहेत. बड्या टोळ्या जेरबंद असल्याने गल्लीबोळांतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अल्पवयीन मुलांनी डोके वर काढले आहेत. आता गल्लीत “आपलेच राज्य’ असे म्हणत अल्पवयीन मुलांच्या टोळ्या सशस्त्र फिरत आहेत. त्यांना आवर घालणे पोलिसांना कठीण झाले आहे.
येरवड्यात दोन टोळ्यांची सूत्रे अल्पवयीन मुलांच्या हाती
येरवडा हद्दीतील कसबे आणि कणसिले या दोन टोळ्यांवर “मोक्का’ लागला आहे. या दोन्ही टोळ्यांचे प्रमुख आणि सदस्य मागील दोन वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यांना मोक्का लागला तेव्हा त्यांना आदर्श मानणारी 14 ते 15 वर्षांची असलेली मुले आता 16 ते 17 वर्षाची झाली आहेत. दोन्ही टोळ्या आत असल्याने निर्माण झालेली पोकळी ही अल्पवयीन मुले भरुन काढण्याच्या प्रयत्नात आहेत. भाईच्या टोळीचे अस्तित्व टिकवण्यासाठी ती धडपडत आहेत.
यातूनच मागील वर्षभरात दोन्ही टोळ्यांशी संलग्न असलेल्या अल्पवयीन मुलांची एकमेकांशी चकमक उडत आहे. याचाच भडका शनिवारी रात्री येरवडा परिसरात उडाला. येरवड्यात कसबे आणि कणसिले टोळ्यांशी संबंधित अल्पवयीन मुलांमध्ये मोठा राडा झाला. कोयता, पालघन आणि बिअरच्या बाटल्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. परिसरातील दोन रिक्षांच्या काचा फोडून हत्यारे नाचवण्यात आली. यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा टोळ्यांची दहशत अनुभवली.
घटना नेमकी काय घडली?
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल्ला खान (19, रा. लक्ष्मीनगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार 15 वर्षे वय असलेल्य तीन आणि 16 वर्षे वयाच्या मुलांवर खुनाच्या प्रयत्नाचा आणि दहशत पसरवण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल्ला आणि आरोपींमध्ये सहा महिन्यांपूर्वी फुटबॉल खेळण्यावरुन वाद झाले होते. त्यावरून खान हा त्याचा मित्र महेश मिश्रा आणि आयुषसह दुचाकीवरुन जाताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना अल्पवयीन आरोपींनी जाब विचारत कोयता आणि बांबूने हल्ला चढवला. यामध्ये महेश गंभीर जखमी झाला.
आरोपींनी परिसरातील दोन रिक्षा फोडल्या. तर, एका 17 वर्षीय मुलाने परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शरद इंगळे (27) आणि विवेक गवळी (20) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांवरही मारहाण आणि दहशतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.
पंटरांचा शहरभर धुडगूस, पोलिसांसमोर आव्हान
शहरातील बहुतेक भागांमध्ये बडे टोळीप्रमुख शिक्षा भोगत आहेत. यामुळे त्याच्या अल्पवयीन पंटर लोकांमध्ये मात्र धुसफूस सुरू आहे. ही धुसफूस अनेकदा वाहनांची तोडफोड-जाळपोळ, घरांवर दगडफेक, शस्त्र घेऊन दहशत पसरवणे अशा प्रकारातून पुढे येत आहे. वारजे-माळवाडी, कोथरुड आणि येरवडा परिसरात अशा अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी धुडगूस सुरू केला आहे. यामुळे टोळ्या आत टाकल्यातरी त्यांच्या अल्पवयीन पंटर लोकांवर मात्र लक्ष ठेवणे गरजेचे आहे.