पुणे, दि. 23 -दीपोत्सवातील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. ही पूजा सोमवारी (दि. 24) होत आहे. दरम्यान, रविवारी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मंडईसह, मार्केटयार्ड, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बाजीराव रस्ता, नेहरू रस्ता या मार्गावर रस्त्यावरील पदपथावर तोबा गर्दी केली होती. काहींनी पदपथावरच व्यवसाय थाटला आहे. यंदा छोट्या व्यावसायिकांनाही रोजगार मिळत असल्याने ही दिवाळी सर्वांसाठी गोड होत आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीच्या रुपाने लक्ष्मीची पाऊले घरोघरी पडत असल्याचे दृश्य आहे.
मागील काही दिवस पावसात गेल्याने पुणेकर शनिवारी खरेदीसाठी घराबाहेर पडलेले दिसले. यात लक्ष्मी (केरसुणी), लाह्या, बत्ताशी, पणती, कलर रांगोळी, लक्ष्मी पट्टी, स्टीकर, किल्लावरील सैनिक, वेगवेगळी चित्रे, बोलके इ. साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून लक्ष्मीपूजनानिमित्त कीर्द, खतावण्यांचे पूजन करण्यात येते. प्रथेप्रमाणे बोहरी आळीतील व्यापाऱ्यांकडून कीर्द, खतावण्यांची खरेदी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली.
यंदा नागरिकांकडून उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची लगबग सकाळपासूनच आहे. सोमवारी (दि. 24) मागणी असणार आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना चांगला व्यवसाय होत आहे.
– गणेश भालेराव, लक्ष्मीपूजन साहित्याचे किरकोळ विक्रेते.
साहित्य प्रकार – भाव (रुपयांत)
लक्ष्मी ( केरसुणी) जोडी : 100
पणत्या (डझन) : 50 ते 150 रु.
लाह्या, बत्तासे पाकीट : 20
बोळके पाच नग : 60
लक्ष्मी पट्टी : 20 ते 60 रु. नग
हळद, कुंकू : (पाकीट) 20 ते 80