पुणे – ‘भंगार’ बसेसवर आरटीओची कारवाई

12 बसेसना संचलन थांबविण्याची नोटीस


दुरुस्त करुनच मार्गावर आणण्याच्या सूचना

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) प्रशासनाने पीएमपीच्या खिळखिळ्या बसेसची तपासणी सुरू केली आहे. आरटीओकडून मार्गावर धावण्यास असक्षम असलेल्या 12 बसेसवर कारवाई केली असून संचलन थांबवण्यात आले आहे. प्रवाशांना असुरक्षित बसेसमधून प्रवास करावा लागत असून याकडे आरटीओ प्रशासन दुर्लक्ष्य करत असल्याचे वृत्त दै. “प्रभात’ने वेळोवेळी प्रसिद्ध केले होते.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बहुतांश बस जुन्या असून आयुर्मान संपलेल्या बसची संख्या 150 पेक्षा जास्त आहे. यामुळे बस “ब्रेकडाऊन’ होणे, धावत्या बसला आग लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आसनांची दुरवस्था, फुटलेल्या काचा, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी नसणे तसेच प्रवाशांसाठी आवश्‍यक सुविधांचा अभाव असलेल्या बसमधून प्रवाशांनाही जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर आरटीओ प्रशासनाने बसेस तपासणीची मोहीम हाती घेतली असून खिळखिळ्या बसेसवर कारवाई सुरू केली आहे.

याअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांवरील बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 12 बस मार्गावर धावण्यास असक्षम असल्याचे तपासासदरम्यान आढळून आले.

असुरक्षित पीएमपी बसेसबाबत सातत्याने येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी सुरू आहे. दोषी आढळलेल्या बसचे संचनल थांबविण्याचे सांगण्यात आले आहे. यापुढेही कारवाई सुरू राहील.
– विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.