पुणे -‘आरटीई’ प्रवेश ऑफलाइन; यंत्रणा ‘ऑफलाइन’

पालकांना दिलासा मिळेना : सायबर कॅफेतूनच अर्ज भरण्याची वेळ : मदत केंद्र दिखाव्यासाठीच

– डॉ.राजू गुरव

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’ च्या 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून पुणे जिल्ह्यात 93 ठिकाणी मदत केंद्र सुरु केल्याचा दिखावा करण्यात आला आहे. या केंद्रांवर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. यामुळे पालकांना सायबर कॅफेत जाऊनच अर्ज भरण्याची वेळ आली आहे. मदत केंद्रांतून पालकांना मदतच मिळत नसल्याचे उघड होऊ लागले आहे.

राज्यातील खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना “आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया शासनाकडून 5 मार्च पासून सुरु करण्यात आली आहे. यात

बहुसंख्य मुलांच्या पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणी येत असतात. या सोडविण्यासाठी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात आल्याची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यात मदत केंद्र नाव, संपर्क पत्ता, व्यक्तीचा संपकासाठी मोबाइल नंबर व लॅंडलाइन फोन नंबर आदी माहिती आहे. खडकी, धायरी, पुणे कॅम्प, शिरुर, वालचंदनगर, मुळशी, पौड, भोर, इंदापूर, दौंड, भोसरी, वाघोली, नसरापूर, खेड, जेजुरी, आंबेगाव, जुन्नर, आकुर्डी, दिघी, वाकड, कोथरुड, औंध, डेक्कन जिमखाना, वडगाव बुद्रुक, हडपसर, रामटेकडी आदी ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात आल्याचा दिखावा करण्यात आलेला आहे.

मदतच नाही, केंद्रांचा उपयोग काय?
मदत केंद्रांवर संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी कोणत्याच सुविधा नसल्याचे चित्र आढळून येऊ लागले आहे. तर काही ठिकाणच्या या सुविधांमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. पालक मदत केंद्रावर जातात. तेथे ऑनलाइन अर्जच भरता येत नाहीत. तेथील व्यक्तींकडून सायबर कॅफेमध्ये जाण्यास सांगण्यात येत आहे. यामुळे पालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मदत केंद्रांचा उपयोगच काय? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

अधिकारी गैरहजर; अडचणी कायम
विविध विषयांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पालक व विविध संघटना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात धाव घेतात. मात्र, या ठिकाणी त्यांना प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर व इतर काही अधिकारी कार्यालयात कधीच उपस्थित राहत नाहीत, शिवाय फोनही रिसिव्ह करत नाहीत. काही अधिकारी तर माहितीच देत नाहीत. “साहेब न्यायालयात सुनावणीला गेले आहेत,’ “आत्ताच बैठकीला गेले आहेत,” “बैठकीत व्यस्त आहेत,’ “पाहणी दौऱ्यावर आहेत,’ अशी उत्तरे कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. यामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडेच सतत गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे शिक्षण आयुक्तांच्या डोकेदुखीत वाढ होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)