पुणे – आगामी पुणे महापालिका निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधनी पुर्ण झाली असून अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोलतोडे, माऊली सलगर, रविंद्र चासकर, बाळासाहेब कोकरे, अॅड. संजन माने, पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर, अंकुश देवडकर, महिला आघाडीच्या सविता जोशी, सुनिता किर्वे आदी उपस्थित होते. पुढील वर्षी पुणे महापालिकेची निवडणूक होणार असून अनेक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर रासपने देखील स्वबळाचा नारा दिला असून मोर्चेबांधनी सुरु केली.
आमदार गुट्टे म्हणाले, आगामी निवडणूकीत पक्ष स्वबळावर निवडणूक लढेल. पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत देखील पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. नूकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाचे राज्यात तीन हजार ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूकीत देखील पक्षाने तयारी सुरू केली आहे.