पुणे – महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून कामे झाल्याचे दाखवत तब्बल 99 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फेब्रुवारी ते 21 ऑक्टोबर कालावाधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी मनपा कर्मचारी योगेश चंद्रशेखर मोरे (रा. गणेश पार्क, सिंहगड रोड) याच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागातील अधिकारी प्रल्हाद पवार यांनी फिर्याद नोंदवली आहे. बाणेर, नवी पेठ आणि कोथरूड येथील स्मशानभूमीत विद्युतविषयक कामे केल्याचे मोरे याने दाखवले. तसेच त्याबाबतची 99 लाख 8 हजार रुपयांची बनावट बिले तयार केली. ती खरी असल्याचे भासावे म्हणून त्याने महापालिकेचे सर्वसाधारण फॉर्म बिल तयार करून त्यावर संबंधित अधिकाऱ्याच्या बनावट सह्या व शिक्के मारले.
या बिलाचे परस्पर कार्यालयीन जावक करून आरोग्य विभागाकडे ही बिले पाठवली होती. यातून महानगरपालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे पवार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या गुरुवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.