कात्रज –कात्रज चौक ते कोंढवा खडी मशीन चौक रस्त्याचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. पथ विभागांकडून रस्ता दुरुस्ती आणि जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी डांबरीकरणासाठी 5 कोटी रुपये मंजूर करून काम केले आहे.
मात्र, अनेक ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांमुळे काम अर्धवट स्थितीत आहे, अशा ठिकाणी रस्ता अरूंद आहे. त्यातच अतिक्रमण वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने कारवाई करत कात्रज-कोंढवा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
कात्रज चौक ते कोंढवा खडी मशीन चौक रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यातच अरुंद रस्ता असताना दुतर्फा अवजड वाहने थांबलेली असतात. त्यात हातगाडी, पत्राशेड, कंपाउंड अशा अतिक्रमणांची भर पडत आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरचा रस्ता पार करण्यासाठी वाहनचालकांना किमान तासभर कोंडीत अडकून राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी याच रस्त्यावर मुंगीच्या पावसाने वाहने पुढे सरकतात.
या रस्त्याचे रुंदीकरणाबाबत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात प्रशासक फास्ट मोडमध्ये होते. त्यातून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाया झाल्या. मात्र, कात्रज-कोंढवा रस्त्याकडे प्रशासकांचे अजूनही लक्ष गेलेले दिसत नाही.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील खडी मशीन चौकाकडून मुख्य रस्त्यावरील 700 मीटर रस्त्यावरील रस्ता दुरुस्ती अंतर्गत डांबरीकरणाचे काम झाले आहे. उर्वरित रस्त्यावरील काम, महिनाअखेरपर्यंत काम पूर्ण होईल. अतिक्रमणे मूळ मालकाच्या जागेत आहेत, त्या जागा अजून ताब्यात नाहीत. तो प्रश्न निकाली निघाला की, कामाला वेग येईल.
– विनायक कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग, मनपा