पुणे – शहरात आठवडाभराच्या पावसाने रस्त्यांची दुरवस्था पाहता, पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्याचवेळी शहरातील रस्ते चांगले ठेवण्यासाठी एकच यंत्रणा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात तीन प्रशासकीय विभाग स्वतंत्रपणे रस्ते दुरुस्ती करत असल्याचे समोर आले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर यंदा या तिन्ही विभागांनी एकाच वेळी रस्ते दुरुस्ती केली आहे. त्यामुळे रस्ता एक आणि खड्डे दुरूस्त करणाऱ्या यंत्रणा तीन, यामुळे रस्त्यांची स्थिती भयावह झाल्याचे वास्तव आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत महापालिकेत रस्ते दुरुस्ती जबाबदारी पथ विभागाकडेच होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पथ विभाग रस्त्यांची तपासणी करून जे रस्ते उखडू शकतील, ते पूर्णत: रिसर्फेसिंग करत होता. तसेच रस्ते एकाच पद्धतीने दुरूस्त केले जात होते.
मात्र, दोन वर्षांपूर्वी पालिकेने शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. योजनेतील अटींनुसार, “जेथे जलवाहिनी टाकली जाणार आहे, तेथे खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती कॉंक्रिटीकरणाद्वारे संबंधित कंपनीने करायची आहे.’ त्याचवेळी ड्रेनेज विभागाचेही काम सध्या सुरू असून, या विभागाचा जो ठेकेदार खोदाई करेल त्याने तेथील रस्ता दुरुस्ती करायची आहे. ही दुरुस्ती ठेकेदार कॉंक्रिटीकरण अथवा डांबरीकरणाने करतात. रत्यामुळे या वर्षी शहरात रस्त्यांची दुरुस्ती एकाच वेळी तीन विभाग करत असल्याने रस्ते दुरुस्तीचा कोणताही ताळमेळ नाही.
रस्त्यांवरील ठिगळांचे “प्रदर्शन’
मध्यवर्ती पेठांमधील सर्व प्रमुख रस्ते मनपा पथ विभागाने मागील वर्षी रिसर्फेसिंग केले होते. त्यामुळे पुढे तीन वर्षे ते टिकले असते. मात्र, लॉकडाऊनचे नाव पुढे करत हे रस्ते यंदा मार्चपासून ड्रेनेज विभाग आणि समान पाणी योजना जलवाहिनीसाठी खोदण्यात आले. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या डांबरी रस्त्यांना सिमेंटचे पट्टे देण्यात आले.
तर ड्रेनेज विभागाने “जमेल तशी’ दुरुस्ती केली असून त्यानंतर पथ विभागाने “जागा मिळेल तिथे’ भर पावसात खड्डे दुरुस्ती केली. त्यामुळे या रस्त्यांवर एका बाजूला डांबरी पट्ट्या, मध्यभागी सिमेंटच्या पट्ट्या तर कडेला ठरावीक अंतरावर डांबरी खडी विखुरल्याचे चित्र आहे. यातून काही रस्त्यांचे “प्रदर्शन’च भरवण्याचा घाट महापालिकेने घातला आहे.