पुणे – डांबराच्या तुटवड्याने रस्ते दुरुस्ती अडचणीत

महापालिकेने ठरविला रस्त्यांचा प्राधान्यक्रम

पुणे – पावसाळ्यापूर्वीच्या रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांची खोदाई 30 एप्रिलपासून बंद केली आहे. पालिकेच्या नियोजनानुसार ही दुरुस्ती 31 मेपर्यंत करण्यात येणार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रस्ते कामासाठी डांबराचा तुटवडा असल्याने ही मोहीम अडचणीत सापडली आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती आवश्‍यक अशाच रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. दरम्यान, पावसाळ्यात उखडू शकणाऱ्या सुमारे 80 ते 90 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.

शहरातील रस्ते पावसाळ्यात खड्डेमुक्‍त असावेत, यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे रिसर्फेसिंग केले जाते. त्यात प्रामुख्याने पथ विभागाने निश्‍चित केलेल्या आठ झोनमधील रस्त्यांचे सर्वेक्षण करून कोणत्या रस्त्यावर कोठे खड्डे पडण्याची शक्‍यता आहे, तसेच कुठला रस्ता उखडू शकतो याचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर या रस्त्यांची दुरूस्ती 1 ते 31 मे या कालावधीत केली जाते. त्यासाठी महापालिकेचा डांबर आणि खडी मिश्रणाचा स्वतंत्र हॉटमिक्‍स प्लॅंट येरवडा येथे असून आवश्‍यकतेनुसार, त्या ठिकाणाहून हे मटेरियल रस्ते दुरूस्तीसाठी पाठविले जाते. महापालिकेकडून या प्लॅंटसाठी हिदूस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमकडून डांबर खरेदी केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही कंपन्यांकडे डांबराचा तुटवडा आहे. त्यामुळे पालिकेस मागणी असलेल्या गाड्यांच्या तुलनेत केवळ 30 ते 40 टक्‍केच डांबर उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रशासनाचा वेळ वाया जात आहे. त्यातच, शहरात गेल्या वर्षभरात मोठया प्रमाणात रस्ते खोदाई झाली असून डांबर उपलब्ध नसल्याने डांबरी रस्त्यावर सिमेंटकॉक्रिट मिक्‍सद्वारे रस्ते दुरूस्ती करावी लागत आहे. तर हा डांबराचा तुटवडा आणखी काही महिने कायम राहणार आहे.

शहर खड्डेमुक्‍त ठेवण्यावर भर
महापालिकेस आवश्‍यक असलेले डांबर मिळत नसल्याने दुरूस्तीसाठी रस्त्यांची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, तातडीच्या कामासाठीच उपलब्ध डांबर वापरण्यात येत आहे. तसेच पावसाळ्याच्या तोंडावर जास्तीत जास्त रस्ते पूर्ववत करून शहरातील रस्ते खड्डेमुक्त ठेवण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.