पुणे : बेशिस्त पार्किंगने अडवला रस्ता

रस्त्यावर चारचाकींचे “दुहेरी’ पार्किंग


वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध नसल्याने कोंडी होऊन रांगा

पुणे – एकीकडे स्वारगेट चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यातच सोमवारी स्वारगेट येथे गणेश कला क्रीडा मंचापासून सणस मैदानापर्यंतच्या रस्त्यावर चारचाकींचे “दुहेरी’ पार्किंग झाले होते. त्यामुळे वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध नव्हता. परिणामी, या रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सर्वाधिक रहदारी असणाऱ्या चौकांमध्ये स्वारगेट येथील चौकाचा समावेश होतो. या रस्त्यावर उभ्या असणाऱ्या रिक्षा, या भागात सुरू असणारे मेट्रोचे काम यामुळे या परिसरातील रस्ते अरुंद झाले आहेत. जेधे चौकाकडून सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या भागात ग्रेड सेपरेटरचेदेखील काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. यातच सोमवारी गणेश कला क्रीडा मंच येथे हवेलीमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या भागात उमेदवार, समर्थकांसह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

पर्यायाने सर्व माननीयांची चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. या बेशिस्तपणे उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे बसेससह सर्वच वाहनांना अपुरा रस्ता शिल्लक राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. परिणामी, या रस्त्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी देखील उद्‌भवली.

सभागृहाच्या आवारात पार्किंगची व्यवस्था असूनदेखील बहुतांशवेळा या सभागृहात येणाऱ्या नागरिकांची चारचाकी वाहने या रस्त्यावरच उभी राहतात. सोमवारीदेखील केवळ याच परिसरातच नव्हे तर, गणेश कला क्रीडा मंचापासून सणस मैदानापर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूला आणि सणस मैदानाकडून हिराबाग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अर्धा रस्ता पार्किंगच आहे की काय, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.