पुणे – नदीपात्रातील भिडे पूल ते रजपूत वस्ती दरम्यानचा रस्ता मुठा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला होता. आता. पाऊसही थांबला आहे आणि पूरही ओसरला आहे. तरीही, रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. रात्रीच्यावेळी या ठिकाणी काळाकुट्ट अंधार असतो. यातून किरकोळळ अपघात घडत आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरू करणे गरजेचे आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीत ४५ क्यूसेस पाणी सोडण्यात आले होते. यामुळे नदीला पूर आलल्याने काठावरील सोसायटी, वस्त्यांमध्ये पाणी शिरले तसेच नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली गेला, यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. पूर ओसरल्यानंतर महावितरणने तातडीने काम करून अनेक सोसायट्यांचा वीज पुरवठा सुरळीतही केला परंतु, नदीपात्रातील रस्त्यावरील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे हा रस्ता अंधारात बुडाला आहे.
महापालिकेने जयंतराव टिळक पूल ते रजपूत वस्ती दरम्यानच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा बंद ठेवला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असला तरी पूर ओसरून चार-पाच दिवस झाले आहेत. टिळक पूल ते भिडे पूल या दरम्यानचे पथदिवे सुरू करण्यात आलेले असताना भिडे पूल ते रजपूत वस्ती रस्त्यावरील पथदिवे बंद का ठेवले आहेत. असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे. पुरामुळे रस्त्यावर वाहून आलेली खडी तसेच अन्य काही वस्तू तशाच पडलेल्या असल्याने वाहन चालविताना चालकांना काळजी घ्यावी लागत आहे. त्यातच पथदिवे बंद असल्याने अंधारात दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
“नदीला आलेल्या पुरामुळे पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यातच काही ठिकाणचे खांब वाहून गेले असल्याने पथदिवे सुरु केलेले नाहीत. सदर ठिकाणी दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येईल.” – मनिषा शेकटकर, अधिक्षक अभियंता.