पुणे : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचे कथित अपहरणनाट्य सोमवारी रात्री चांगलेच रंगले. मुलगा ऋषिराजला दोघे जण कारमधून घेऊन गेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. मात्र पोलीस तपासात तो मुलगा लोहगाव विमानतळावरुन चार्टर्ड विमानानं मित्रांसह बँकॉकला निघाल्याचं समोर आलं. त्यानंतर सावंतांनी त्यांचं राजकीय वजन वापरुन लेकाला परत आणलं. यामध्ये पोलीस आणि उड्डाण मंत्रालयाची सर्व यंत्रणा मुक्त हस्ते वापरण्यात आली. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांमधून तसेच समाजमाध्यमातून सावंत कुटुंबावर मोठ्या प्रमाणात टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. दरम्यान ऋषीराज आणि त्याच्या दोन्ही मित्रांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ऋषिराज सावंत याने काही दिवसांपूर्वीच ६९ लाख रुपये खर्च करून चार्टड विमानाने दुबईहून परतला होता. त्यानंतर त्याला बँकॉकला जायचं होतं. त्यासाठी त्यानं आदल्या दिवशी ७८ लाख रुपये खर्च करुन चार्टर्ड विमान बुक केलं. त्यावरुन सावंत कुटुंबात ९ फेब्रुवारीला जोरदार वाद झाला. त्यानंतर ऋषिराज बँकॉकला जाणार नाही, असं वडील तानाजी सावंत यांना वाटलं. पण तसं घडलं नाही. कुटुंबियांचं न ऐकता ऋषिराज दोन मित्रांसह विमानाने बँकॉकला निघून गेला.
विशेष म्हणजे त्याच दिवशी त्याच्या पत्नीचा वाढदिवसही होता. यामुळे सावंत यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. ऋषिराजचं अपहरण झालेलं नाही, असं सावंत यांनी माध्यमांना सांगितल. पण सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार देण्यात आली होती. याशिवाय पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ज्या व्यक्तीने कॉल करुन अपहरणाची माहिती दिली, तो त्यांच्या नऱ्हे येथील कॅम्पसमधील कर्मचारीच असल्याचे पुढे आले आहे.
– ऋषीराजच्या योजनेची सावंत कुटूंबाला होती कल्पना
पोलीस दलातील सुत्रांनी सांगितले की, ऋषीराजचे ज्या कारमधून अपहरण करण्यात आले असे सांगितले गेले, ती कार ऋषीराज मागील तीन दिवसांपासून वापरत होता. तसेच तानाजी सावंत यांना ऋषीराज कुठे आणि कोणाबरोबर जाणार याची पुर्ण कल्पना होती. ऋषीराज कायदेशीररीत्या सज्ञान असल्याने त्याला माघारी आणण्यासाठी कायद्याच्या पातळीवर ठोस काही तरी करणे आवश्यक होते. यामुळे सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर नागरी उड्डाण विभागात वेगाने घडामोडी घडल्या. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधण्यात आला. त्यावेळी बंगालच्या उपसागरावरुन विमान उड्डाण करत होते. पायलटशी संपर्क साधून ते माघारी बोलावण्यात आले.
– ऋषीराजला मानसिक धक्का
बाहेर वडिलांच्या आदेशाने घडणाऱ्या सर्व घडामोडींबद्दल ऋषीराज अनभिज्ञ होता. विमान यु टर्न घेऊन लोहगाव विमानतळावर उतरले. ऋषीराज आणि त्यांच्या मित्रांनी बॅकॉकला आलो म्हणून बॅगा घेत दरवाजा उघडला. मात्र बाहेर विमानतळ प्रशासनाचे अधिकारी आणि पुणे पोलीसांचे पथक त्यांच्या स्वागताला उभे होते. त्यांना हे दृश्य पाहून काहीच कळेना. पोलिसांकडून अपहरणाच्या तक्रारीची माहिती मिळताच ऋषीराजला मोठा मानसिक धक्का बसला. दरम्यान ऋषीराज आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून एकसारखाचा जबाब नोंदवत ते बिझनेस संदर्भात बँकॉकला जात होते असे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून भावाला परत आणण्यास यश आले. तो सुखरुपणे रात्री साडेदहाला परत आला. तो न सांगता गेल्याने घरचे अस्वस्थ झाले होते.
— गिरिराज सावंत