पुणे –प्रवासी सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकात रिक्षा, टॅक्सी तपासणी केंद्र उभारावे, अशी मागणी सल्लागार समिती मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
“डीआरएम’ कार्यालयात “डीआरयुसीसी’ विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापिका रेणू शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. बैठकीत सदस्यांनी प्रवासी सुविधेच्या दृष्टीने अनेक मागण्या केल्या. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा उपस्थित होते.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानक परिसरात प्रवासी घेऊन येणाऱ्या तसेच जाणाऱ्या ऑटोरिक्षा टॅक्सीसाठी तपासणी केंद्र असावे, तेव्हाच वाहनांची नोंद राहील.
प्रवासीही सुरक्षित राहतील, या मागणीसह नवीन चौकशी विभाग सुरू करावा, प्रवासी सुरक्षेसाठी लिफ्ट बसवली जावी, स्थानकावरील वॉकिंग रॅंप पुन्हा सुरू करण्यात यावा, आदी मागण्या पुणे विभाग उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य निखील काची यांनी केली आहे.