पुणे – शहरातील रिक्षांच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ होणार आहे. पहिल्या 1.5 किमीसाठी 18 रुपये दर सध्या आकारण्यात येतो. 18 रुपयांऐवजी 20 रुपये दर आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना अधिकचे दोन रुपये मोजावे लागणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याला वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रिक्षांच्या भाडेवाढीबाबत चर्चा झाली.
शहरात 2015 मध्ये शेवटची भाडेवाढ झाली होती. यानंतर झालेली नाही. तर, करोनामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. अखेरीस भाडेवाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 8 नोव्हेंबरपासून रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीत सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे. तर, महापालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागात रात्रीच्या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे.
प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या नगासाठी 3 रुपये इतके शुल्क लागू राहणार आहे.
ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलिब्रेशन) 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत आहे. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करून घेणाऱ्या रिक्षांनाच ही भाडेदरवाढ लागू होईल. मुदत समाप्तीनंतर किमान 7 दिवस आणि कमाल 40 दिवस मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन केले जाणार आहे. तर निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यात इच्छुक ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये आकारण्यात येणार आहे. हे किमान 500 रुपये आणि कमाल 2 हजार रुपये या मर्यादेत असल्याची माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.
अशी आहे दरवाढ
सध्याचा दर सुधारित दर
पहिल्या 1.5 किमीसाठी किमान देय भाडे 18 रुपये 20 रुपये
त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे 12.19 रुपये 13 रुपये