पुणे –राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहेत.
“जेईई’ (मेन) व “नीट’ या सामाईक प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने “एमएचटी-सीईटी’ जुलैमध्ये न घेतला ऑगस्टमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा 1 जून ते 15 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने “सीईटी’चे वेळापत्रकही बदलले आहे.
“सीईटी’ची ऑनलाइन अर्ज नोंदणी 19 मार्च ते 12 एप्रिलपर्यंत होती. तर परीक्षा अंदाजे 2 ते 25 ऑगस्टदरम्यान होणार आहे. तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या “सीईटी’ची ऑनलाइन अर्ज नोंदणी 10 फेब्रुवारी ते 15 एप्रिलपर्यंत उपलब्ध होती. यासंबंधित “सीईटी’ही ऑगस्टमध्येच होणार आहे. “एमएचटी-सीईटी’ ही प्रवेश परीक्षा 5 ते 20 ऑगस्टदरम्यान होणार आहे. कला शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येणारी “सीईटी’ 12 जून रोजी होणार आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी जारी केले आहे.