पुणे : करोनानंतर राज्य शिक्षण मंडळाने बारावीची आणि तेही ऑफलाइन पद्धतीने राज्यभरात यशस्वीपणे परीक्षा घेतली आणि निकालही वेळेत जाहीर केला. दरवर्षी बारावी निकालानंतर अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी त्वरित प्रवेशप्रक्रिया दरवर्षी सुरू होते. यंदा मात्र ऑगस्टमध्ये ही सीईटी होणार आहे. त्यामुळे निकाल वेळेत लागला असला, तरी प्रवेशासाठी आणखी दोन-अडीच महिने विद्यार्थ्यांना प्रवेशाविना घरीच बसावे लागणार आहे.
बारावीची मूळ गुणपत्रिका 17 जूनला मिळणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होईल. तत्पूर्वी सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीची परीक्षा अजूनही सुरू असून, ती 15 जूनला संपणार आहे. त्यामुळे पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी काही महाविद्यालयांनी फार घाई न करता सीबीएसई बोर्डाच्या निकालानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू करणार आहेत.
मेडिकल प्रवेशासाठी “नीट’ आणि देशातील आयआयटी, नामवंत अभियांत्रिकी शिक्षण संस्थांसाठी प्रवेशासाठी घेण्यात येणारी “जेईई’ या दोन्ही प्रवेश परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुकला अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. या सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होईल. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत ही सर्व प्रवेश प्रक्रिया होईल. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील, अशी चिन्हे आहेत.
दोन महिने उपलब्ध, प्रवेशाचे नियोजन करा
निकाल जाहीर झाल्यानंतर मेडिकल, इंजिनिअरिंग की फार्मसी असे मुख्य पर्याय विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांपुढे असतो. याचे सर्व नियोजन मात्र ऑगस्टमध्ये होणाऱ्या सीईटीच्या गुणांवर अवलंबून असते. सीईटीत किती गुण मिळतात, त्यावर कोणत्या अभ्यासक्रमाला घ्यायचे, याची चाचपणी केली जाते. सध्या किमान दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे मेडिकल, इंजिनिअरिंग अथवा फार्मसी वगळता माहिती तंत्रज्ञानावर आधारित बरेच अभ्यासक्रम विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात सुरू आहेत. त्याची माहिती घेऊन प्रवेशाचे नियोजन करणे योग्य राहील.
आता फक्त अभ्यासाची तयारी
दरवर्षी बारावी परीक्षेनंतर दीड-दोन महिन्यांत सीईटी घेतली जाते. यंदा सीबीएसई बोर्डाचा निकाल न लागल्याने आणि करोनाचा प्रादुर्भावामुळे विस्कळीत झालेले वेळापत्रक या कारणाने बारावी निकालानंतर दोन महिन्यांनी सीईटी होणार आहे. त्यामुळे तूर्तास जेईई, नीट, सीईटीची तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच कालवधी मिळत आहे. या वेळेचा सदुपयोग करून सर्व सीईटीची नियोजन पद्धतीने कसून सराव करणे, हा आता पर्याय आहे.