पुणेकरांना आणखी काही दिवस थंडीची प्रतीक्षा करावी लागणार!

पुणे: शहर परिसरात शनिवारीदेखील ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. शहरात तापमान वाढ आणि ढगाळ वातावरण कायम असून, पुण्यासहित संपूर्ण राज्यात पुढील काही दिवस वातावरणाची अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी काही दिवस थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्याच्या सर्वच भागात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह हजेरी लावीत आहे. पुण्यातही गेले दोन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शहरात गेल्या चोवीस तासात शिवाजीनगर वेधशाळेत 5.3 मिमी तर लोहगाव येथे 22.4 मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन ते आता ओमानकडे सरकणार आहे. याबरोबरच हिंदी महासागर ते दक्षिण बंगालचा उपसागरापर्यत कमी दाबाचा पट्टा 23 नोव्हेंबरपर्यत तयार होणार आहे. या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार असून, हा पट्टा श्रीलंका ते तामिळनाडूनच्या किनारपट्टीकडे पुढील 48 तासात सरकणार आहे .

यामुळे ईशान्य मान्सून आणखी सक्रीय होणार आहे. याबरोबरच उत्तर मध्यमहाराष्ट्रावर चक्रीय स्थिती कार्यरत असून, बिहार ते दक्षिणपूर्व मध्यप्रदेशपर्यत द्रोणीय स्थिती कार्यरत आहे. या सर्व स्थितीमुळे उत्तर भारतातून थंडी गायब झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना थंडीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याच बरोबर दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रीय झाला आहे. तर उत्तर भारताकडून राज्याकडे वाहत असलेल्या वा-यांच्या माध्यमातून आर्द्रता येत आहे. त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शनिवारी शहरात 32.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान तर 19.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.