पुणे – महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असून, त्याची रंगीत तालीम सोमवारी घेण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ही सोडत असून अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या आरक्षणासाठी ही सोडत होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत ही रंगीत तालीम झाली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, उपआयुक्त (निवडणूक) डॉ. यशवंत माने, महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर, ई-प्रशासक (सांख्यिकी आणि संगणक) राहुल जगताप, प्रशासकीय सुरक्षा अधिकारी राकेश विटकर तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पालिकेचीही तयारी…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रभागरचना अंतिम केल्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही सोडत मंगळवारी सकाळी 11 वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. एससी, एसटी आणि सर्वसाधारण गटातील महिलांच्या राखीव जागांबाबत ही सोडत होणार आहे. महापालिकेची सदस्य संख्या 128 वरून वाढून ती 139 इतकी झाली आहे. तर प्रभागांची संख्या 46 इतकी आहे. महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असून 70 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे निम्म्या प्रभागांमध्ये महिलांसाठी दोन जागा तर निम्म्या प्रभागांमधील एक जागा महिलांसाठी राखीव असणार आहे.