पुणे – साडेतीन हजार घरांसाठी 2 महिन्यांत पुन्हा सोडत

पुणे – म्हाडा पुणे विभागामार्फत येत्या दोन महिन्यांत पुन्हा 3 हजार 500 घरांसाठी सोडत होणार असल्याची माहिती म्हाडा पुणे विभागाचे सभापती समरजितसिंह घाटगे पाटील यांनी दिली.

अल्पबचत भवन येथे म्हाडाच्या 4 हजार 756 घरांसाठीची ऑनलाइन पध्दतीने सोडत पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, निवृत्त न्यायाधीश कुंडलिक पाटील, विभागीय उपायुक्‍त दीपक नलावडे, एनआयसीचे धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी घर मिळालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

घाटगे पाटील म्हणाले, 2017 पासून म्हाडाची ही तिसरी सोडत असून दोन वर्षांत 9 हजार 500 घरांसाठीची सोडत झाली आहे. आज म्हाडाच्या 4 हजार 756 घरांसाठी 41 हजार 501 अर्ज आले आहेत. म्हाडाच्या सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. यामध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोटा नसतो. सर्वच्या सर्व घरांचे लाभार्थी हे ऑनलाइनच प्रक्रियेद्वारे निवडले जात आहेत.

प्रास्ताविकात अशोक पाटील म्हणाले, म्हाडाच्या घरांच्या सोडतीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. घरांची मोठी मागणी असून ही मागणी पूर्ण करण्यास म्हाडा कटिबद्ध आहे.

“जास्तीत जास्त घरे निर्माण करण्यास प्राधान्य’
पुण्यामध्ये घरांची मागणी वाढली आहे. पुढील काळात पुण्यामध्ये म्हाडामार्फत जास्तीत जास्त घरे निर्माण करण्यास प्राधान्य असल्याचे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. लॉटरीच्या सोडतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. सामंत म्हणाले, कमी दरात घरे मिळत असल्याने म्हाडामधील घरांना नागरिक पसंती देत आहेत. त्यामुळे येत्या काळात पुण्यात अधिकाधिक घरे निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईमध्ये म्हाडाचे चांगले काम सुरू आहे. येथे हजारो लोकांना घरे उपलब्ध करून दिली आहेत. अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न घट या सर्व घटकांसाठी म्हाडाकडून घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.