पुणे – शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करू – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे – “लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशूंक स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा,’ असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे सांगितले. यावेळी शहरातील शिवसेनेचे काही पदाधिकारी नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीवर ही टीका केली. त्या म्हणाल्या, “उमेदवार ठरविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी जो वेळ घेतला ते पाहता हे पक्ष गोंधळलेले आहेत. प्रचार सुरू झाला तरी अद्यापही त्यांची ही स्थिती कायम आहे. पुणे शहरात तर कॉंग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हता. गिरीश बापट यांनी गेल्या साडेचार वर्षांत जी कामे केली त्याच्या परिणाम चांगला होत आहे. शिवसेना-भाजपचे नेते सध्या शहरात सर्वत्र एकत्रित प्रचार करत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्यासभेबद्दल डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “त्यांच्याकडे सध्या खूप वेळ आहे. त्यामुळे ते फिरत आहेत.’ राज्यात महायुतीच्या उमेदवारांची स्थिती चांगली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.