पुणे – गेल्या आठवड्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या खपल्या ताज्या असताना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल एक ते दीड तास मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे रस्ते जलमय झाले, तर सखल भागांतील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले होते, तर 12 ठिकाणी झाडपडी झाली. साधारण तासभरातच शिवाजीनगर भागात 43.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, अनेक वसाहतींत घरांमध्येही पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि काही मिनिटांमध्येच रस्ते जलमय झाले. अनेक रस्त्यांवर घोट्यापेक्षा अधिक पाणी साचले. परिणामी शहरांतील वाहतूक संथ झाली होती. भर पावसात गाडी चालवताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली.
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रस्त्यांवर चांगलेच पाणी साचले होते. अनेक ठिकाणी ड्रेनेज, चेंबरमधून पाणी वाहत होते. नागरिकांनी ड्रेनेजचे झाकण उघडून पाण्याचा निचरा करायला जागा केली. मात्र नुसते पाणी नव्हे तर, प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कचरा देखील वाहून आला होता.
स्वारगेट येथील ग्रेड सेपरेटरमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलच्या मागील वसाहतीमधील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
याचबरोबर शिवाजीनगर येथील कोर्ट परिसर, जंगली महाराज रस्ता, डेक्कन, कर्वे रस्ता, मंगळवार पेठ, येरवडा, संगमवाडी, आळंदी रस्ता, सिंहगड रस्ता, म्हात्रे पूल, वारजे आदी परिसरांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
“आफ्टर शॉक’ म्हणजे काय?
साधारणपणे मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर पुढील काही वेळ छोटे-मोठे हादरे सुरूच असतात. अशा हादऱ्यांना “आफ्टर शॉक्स’ असे म्हटले जाते. सध्या मान्सूनचा कालखंड संपला असला, तरी ठराविक दिवसांनी पाऊस पुन्हा-पुन्हा बरसत आहे. त्यामुळे या पावसाला “आफ्टर शॉक’ची उपमा दिली जात आहे.