पुणे – गुन्हे शाखेने रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडू तीन इंजेक्शन हस्तगत करण्यात आली. आरोपी इंजेक्शनची प्रत्येकी 70 हजाराला विक्री करणार होते.
यातील एक आरोपी जीम चालक आहे. त्याने भाड्याने जीम चालवायला घेतली होती. करोनामुळे मागील वर्षभरापासून त्याला सातत्याने जीम बंद ठेवावी लागली होती. यामुळे भाडे देऊ न शकल्याने त्याला जीम बंद करावी लागली होती. पर्यायी उत्पन्नाच्या शोधात राहुल सुनिल काळे (22, रा. लोहगाव, पुणे) आणी विजय दिनकर पाटील (31, रा. वडगाव शेरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या चाललेल्या काळ्या बाजारा संदर्भात माहिती काढून कार्यवाही करत आहे. दरम्यान पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व प्रशांत गायकवाड यांना डेक्कन जिमखाना समोर दोन व्यक्ती रेमडेसिव्हरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सह्याद्री हॉस्पिटल व गरवारे महाविद्यालयाजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे तीन इंजेक्शन सापडले. यानंतर औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आरोपींकडे औषध विक्रीचा परवाना मागितला असता तो मिळाला नाही. यामुळे औषध निरीक्षक जयश्री सवदत्ती यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांनाही 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे, अमोल पवार व महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.