पुणे : लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा असल्याने त्यावेळी वेळ कमी होता. त्यामुळे अर्जांची छाननी केली नाही. आता वार्षिक अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले आणि चारचाकी वाहन असणाऱ्या बहिणींची नावे या लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात येणार असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. लाडकी बहीण याेजनेत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनेस मंजुरी दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. “ज्यावेळी लाडकी बहीण ही योजना आणली त्यावेळी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ द्यायचा होता. परंतु या सगळ्या गोष्टी तपासण्यात आम्हाला वेळ कमी होता.
आतापर्यंत ज्या कोणालाही पैसे देण्यात आलेले आहे त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. पण आता ज्या महिलांकडे चार चाकी वाहन असतील, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तसेच ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असतील अशा महिलांना एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ही माहिती आधार कार्डशी लिंक करण्यात येत असून पुढील कार्यवाही करणार आहे,’ असे पवार म्हणाले.