पुणे – राज्यात बालकांचे नियमित असलेले 97 टक्के लसीकरण पूर्ण केल्याचा दावा राज्य लसीकरण विभागाने केला आहे. त्यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
करोनाची पुढची संभाव्य लाटेत बालकांना संसर्ग होऊ शकेल, असे भाकीत करण्यात आले आहे, त्यादृष्टीने राज्याच्या आणि महापालिका प्रशासनाने बालरोग तज्ज्ञांचा समावेश करून एक “टास्कफोर्स’ तयार केला आहे. या “टास्कफोर्स’ने बालकांच्या नियमित लसीकरणावर भर दिला असून, ते करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
करोना संसर्गाचा परिणाम जसा जनजीवन विस्कळीत होण्यावर झाला आहे, तसेच या बालकांच्या नियमित लसीकरणावरही झाला आहे. मागच्या वर्षीपासून ही लसीकरण साखळी बिघडली आहे. परंतु ती पूर्ववत आणल्याचा दावाही राज्य लसीकरण विभागाने केला आहे.
रोटाव्हायरस, एमएमआर, कांजण्या, गोवर प्रतिबंधक, टायफॉइड, कावीळ, डीटीडब्ल्यूपी, हिपेटायटिस ए, बीसीजी, पोलीओ, बुस्टर अशा लसी शून्य ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येतात. या सगळ्या लसींचा चार्ट मूल जन्मल्यावर देण्यात येतो. त्याचा कालावधीही त्यात नमूद केलेला असतो. पुढचा डोस कधी घ्यायचा याचीही माहिती असते. मूल आजारी असेल तरच लस घेण्याला विलंब होतो.
मात्र, यावेळी करोनाचा प्रादुर्भाव या विलंबाला मोठ्याप्रमाणात कारणीभूत ठरला आहे. लॉकडाऊन आणि मुलांना घराबाहेर घेऊन जाण्याविषयी अनास्था यामुळे या लसींचे डोस घेणे अनेक मुलांचे राहिले होते. सुमारे 35 टक्केच मुलांचे हे नियमित लसीकरण झाल्याचे काही बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, राज्याच्या लसीकरण विभागाने मात्र ज्या “कम्पलसरी’ लसी आहेत, की ज्या सरकारकडून मोफत देण्यात येतात त्या लसी जवळपास 97 टक्के बालकांना दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
“न्युमोकोकल’ लस देण्याचा प्रयत्न
सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या लसींमध्ये “न्युमोकोकल’ लस देण्यात येत नाही. ती लस तुलनेने महाग आहे. मात्र सरकारने ती देण्याचाही निर्णय घेतला आहे. येत्या जून, जुलै पासून ती लसही देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. डी. एन. पाटील यांनी सांगितले.
मागील वर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट मध्ये करोनाचा प्रादुर्भाव खूपच होता. त्यामुळे त्या कालावधीत बालकांचे नियमित लसीकरण कमी होते. परंतु, डिसेंबर-जानेवारी मध्ये त्याचा “बॅकलॉग’ भरत आणला होता. मात्र, फेब्रुवारीमध्ये त्याला पुन्हा खो बसला. मात्र, पुन्हा एकदा ते सुरू करण्यात येईल. या संबंधातील ऑनलाइन बैठक गुरूवार-शुक्रवारच्या दरम्यान घेणार असून, यामध्ये राज्यातील लसीकरणाचे सगळे अधिकारी असतील.
– डॉ. दिलीप पाटील, राज्याच्या लसीकरणाचे
प्रमुख आणि आरोग्य उपसंचालक