पुणे –जिल्हाधिकारी, महापालिका किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतलेल्या ले-आऊटमधील एक-दोन अथवा तीन गुंठे जमिनीच्या व्यवहारांची दस्तनोंदणी होऊ शकते, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
विधान परिषदेमध्ये याविषयी चार आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी उत्तर देताना थोरात यांनी ही माहिती दिली. यावेळी थोरात यांनी सांगितले की, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 च्या तरतुदीनुसार एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्राप्रमाणे असल्यास अशा जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकते. तसेच, एखाद्या सर्व्हेनंबरमधील क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल व अशा क्षेत्रातील एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घ्यायची असेल तर त्या सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यामध्ये एक, दोन अथवा गुंठ्यांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास, अशा मान्य ले आऊटमधील एक-दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकते.
दरम्यान, नोंदणी महानिरीक्षक यांनी काढलेल्या दि. 12 जुलै 2021च्या परिपत्रकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अंतिम न्यायनिवाड्यानंतर शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे थोरात यांनी सांगितले.