पुणे – सीईटी सराव परीक्षेसाठी 55 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे – विद्यार्थ्यांना ऑनलाइन संगणक चाचणीचा अनुभव देण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी सीईटी सराव परीक्षा आयोजित करण्यात आले आहे. सराव परीक्षेसाठी 55 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेचे पहिले वेळापत्रक शनिवारी प्रसिद्ध झाले असून ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीचे परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली.

यंदा एमएचटी-सीईटी प्रथमच ऑनलाइन होत असून, ही परीक्षा 2 मे ते 13 मे या कालावधीत होणार आहे. ऑनलाइन परीक्षेची भीती वाटू नये, यासाठी कक्षाने सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मुदतीत 55 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीईटीची सराव परीक्षा 12 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत होणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांना 11 एप्रिलपासून एसएमएस किंवा ई-मेलद्वारे त्यांच्या सराव परीक्षेची वेळ, तारीख आणि परीक्षा केंद्र कळविण्यात येत आहे. सीईटी परीक्षेचे पेपर पॅटर्न संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सराव परीक्षेमधील प्रश्‍न, त्यांची काठिण्य पातळी ही मुख्य सीईटीच्या परीक्षेशी जुळणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घेणे आवश्‍यक आहे, याकडे परीक्षा कक्षाने लक्ष वेधले आहे.

पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यात रायगड व ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा प्रारंभी घेण्यात येत आहे. नोंदणी करताना विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्राची निवड करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना सराव परीक्षेचे केंद्र देण्यात आले. ही परीक्षा दि. 15 ते 17 एप्रिलदरम्यान संबंधित जिल्ह्यात होणार असल्याचे सीईटी कक्षाने नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.