पुणे – संस्थांना नूतनीकरण व वाढीव सेटअपची नोंदणी बंधनकारक

पाच वर्षांसाठी नूतनीकरण आवश्‍यक : सेटअप तपासणीची सक्‍ती

पुणे – शासकीय संगणक टायपिंग संस्थांनी नूतनीकरण व वाढीव संगणक सेटअपची नोंदणी करण्याचे बंधन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेकडून दरवर्षी नियमितपणे संगणक टायपिंगसाठी परीक्षा घेण्यात येतात. या अभ्यासक्रमासाठी शासनाकडून मान्यता देण्यात येत असते. मान्यतेची मुदत संपल्यानंतर संस्थांनी नूतनीकरण करणे आवश्‍यक आहे. पाच वर्षांसाठी संस्थाना नूतनीकरण करता येणार आहे. संस्थांनी वाढीव संगणक सेटअपही केलेले आहेत. त्याची तपासणी करून घेण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. तपासणीचे अहवाल दि. 30 एप्रिलपर्यंत परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदविण्याच्या सूचना टायपिंगच्या संस्थांना देण्यात आलेल्या आहेत. येत्या जुलैमध्ये परीक्षेसाठी नोंदणीसह आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही आवेदनपत्रे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून मान्य क्षमतेनुसारच भरण्यात येणार आहेत.

काही संस्थांचे नूतनीकरण व वाढीव संगणक सेटअपचे प्रस्ताव हे विभागीय शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेले आहेत. अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे हे प्रस्ताव प्रलंबित पडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आवेदनपत्रे भरताना क्षमतेनुसार भरणे ही अट पुढील आदेशापर्यंत शिथील करण्यात येत आहे. संस्थांनी आदेशाची प्रत अपलोड करावी अन्यथा संस्थांना परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही, अशा सूचना राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी शासनमान्य संगणक टंकलेखन संस्थांच्या प्राचार्य व संस्थाचालकांना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.