पुणे – परवाना असतानाही नियमांचा अट्टहास का?

फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिकांचा सवाल : नियम अंमलबजावणीसाठी भाडेपावती बंद

पुणे – “फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिकांना व्यवसायासाठी सकाळी 9 ते रात्री 9 अशी वेळ कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठरवून दिली होती. बरेच दिवस या नियमाची अंमलबजावणी झालेली नव्हती. मात्र, सध्या या नियमाचा दुजोरा देत, बोर्डाने व्यापाऱ्यांना भाडेपावती देणे बंद केले आहे.

मोठ्या प्रमाणात असलेला माल दररोज ने-आण करायचा कसा? असा व्यापाऱ्यांना पडला असून, अधिकृत परवाना असतानाही या नियमाचा अट्टहास का?’ असा प्रश्‍न येथील व्यावसायिक उपस्थित करत आहेत.

लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट येथे व्यावसायिकांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिली होती. सुरूवातीला व्यावसायिकांना सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेतच व्यवसायाची मुभा देण्यात आली होती. मात्र, कालांतराने बोर्ड अधिकाऱ्यांना या नियमाचा विसर पडला. तसेच अनेक व्यावसायिकांनी याठिकाणी आपली दुकाने थाटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मालाची आवक होऊ लागली. साहजिकपणे हा माल दुकानातच ठेवला जाऊ लागला.

मात्र, गेल्या काही काळापासून येथील अनधिकृत दुकानदारांचा प्रश्‍न भेडसावू लागल्याने बोर्डाने पुन्हा एकदा जुन्या नियमावलीचा आधार घेत, फॅशन स्ट्रीट येथील व्यावसायिकांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंतच व्यवसाय तसेच रात्री जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, स्थानिक व्यावसायिकांनी यासाठी विरोध दर्शविला असता, बोर्डाकडून दुकानदारांना भाडेकराराची पावती दिली जात नसल्याची तक्रार फॅशन स्ट्रीट पथारी असोसिएशनचे सचिव मजहर कुरेशी यांनी केली आहे. तसेच हा नियम जाचक असून, त्यामुळे व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकाराने व्यावसायिक कात्र अडचणीत आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.