पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील ११७ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमआरडीएने या गावांचा विकास आराखडा तयार केला असून त्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणीही घेतली आहे. हा आराखडा आता मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे, असे असतानाही एमएसआरडीसीने या गावांचा पुन्हा नव्याने विकास आराखडा (डीपी) करण्याचे काम हाती घेतले आहे.
रिंगरोडच्या दोन्ही बाजूस एक किलोमीटरच्या अंतरातील ११७ गावांच्या म्हणजे ६६८ चौरस किलोमीटर परिसराच्या विकासाचे अधिकार राज्य सरकारने ‘एमएसआरडीसी’ला दिले आहेत. त्यासाठी ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून महामंडळाला दर्जा देण्यात आला आहे. महामंडळाकडून या ११७ गावांचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठीचा इरादा जाहीर करण्यात आला आहे. येत्या आठ महिन्यात प्रारूप आराखडा महामंडळाकडून तयार करण्यात येणार आहे. त्यांनतर पुन्हा तो नागरिकांच्या हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर सुनावणी घेऊन तो अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या गावांचा प्रारुप विकास आराखडा एकदा प्रसिध्द करून त्यावर सुनावणीची प्रक्रिया सुध्दा झाली आहे. त्यामुळे नव्याने पुन्हा विकास आराखडा का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे एमएसआरडीसीच्या नव्याने होणाऱ्या विकास आराखड्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणती आरक्षणे असणार आहेत, याबद्दल सगळ्यांच्याच मनात चिंतेसह उत्सुकता निर्माण झाली आहे.
या गावांचा पुन्हा होणार विकास आराखडा
* हवेली – गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर, थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वांजळेवाडी, खाडेवाडी, बहूली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी
* भोर – भांबवडे, भोंगवली, धनगवाडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निधन, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सावर्दरे, तपरेवाडी, उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपी, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, परवडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी
* पुरंदर – कोडित खुर्द, पूर, पोखर, वारवाडी, कुंभोशी, सोमुर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, अस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे
* मुळशी – मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी, डावजे, माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंढूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढावळे
* वेल्हे – वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे