पुणे – ‘रातराणी’ बसेसला लवकरच ‘गती’ मिळणार

प्रायोगिक तत्वावर दोन बसेसची चाचणी यशस्वी

पुणे – खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या “रातराणी’ बसेसला आगामी काळात आणखी “गती’ मिळणार आहे. प्रायोगिक तत्वावर दोन बसेसची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या वतीने आणखी पन्नास बसेसची बांधणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस विनावातानुकुलित असल्याने आणि त्याचे दर अन्य बसेसप्रमाणेच असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत खासगी बसेसने त्यांच्या कारभारात चांगलीच सुधारणा केली आहे. खासगी बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकुलित सेवा मिळत असल्याने एसटी महामंडळाचा बहुतांशी प्रवासी खासगी बसेसकडे वळाला आहे. त्याचा परिणाम महामंडळाच्या व्यवसायावर झाला आहे. त्यांना घाट्यात धंदा करण्याची वेळ आली आहे. त्यातूनच महामंडळाचा तोटा तब्बल 19 हजारांच्याही वर पोहोचला आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी महामंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत अश्‍वमेध, हिरकणी आणि शिवशाही अशा वातानुकुलित तसेच आरामदायी बसेस ताफ्यात आणल्या आहेत. मात्र, त्यातून तोटा कमी होण्यापेक्षा तो अधिकच वाढत चालला आहे.

विशेष म्हणजे महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवशाहीच्या आसनी आणि शयनयान या बसेसला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या बसेसचे भाडे कमी करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. परिणामी महामंडळाचा पाय आणखीनच खोलात चालला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने “रातराणी’ बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस शयनयान आणि आसनी अशा दोनही प्रकारच्या असल्याने त्याचा प्रवाशांना आणि महामंडळालाही फायदा होणार आहे. मात्र, यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन प्रायोगिक तत्वावर दोन बसेस ताफ्यात आणण्यात आल्या होत्या. त्यांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आणखी पन्नास बसेस ताफ्यात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे, त्यानुसार या बसेसची बांधणी पूर्ण झाली असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या बसेस ताफ्यात दाखल होतील असा दावा महामंडळातील सूत्रांनी “प्रभात’ शी बोलताना केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.