Pune : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; न्यायालयाने PSIचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे – लग्नाच्या अमिषाने बलात्कार केल्याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी फेटाळला. विशेष म्हणजे पीडित फिर्यादीने रागाच्या भरात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकपूर्व जामीन देण्यास हरकत नसल्याचे प्रतिज्ञा पत्र न्यायालयात दाखल केले. मात्र, तो पोलीस अधिकारी आहे.

दबाव आणून फिर्यादीला शपथ पत्र न्यायालयात दाखल करण्यास भाग पाडल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला.

प्रवीण नागेश जर्दे (रा. कोथरूड) असे त्याचे नाव आहे. याबाबत 25 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मे 2018 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली. जर्दे याने लग्नाचे अमिष दाखवून फिर्यादीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी पोलीस अधिकारी असल्याचे सांगत तिला शिवीगाळ केली.

मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जर्दे याने केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. त्याला कायद्याचे ज्ञान आहे. तो तपासात ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अटकपूर्व फेटाळण्याची मागणी ऍड. पाठक यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.