वृक्ष लागवडीत पुणे चौथ्या क्रमांकावर

पुणे – राज्यात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कार्यरत असून, ठिकठिकाणी वृक्षलागवड केली जात आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा चौथ्या क्रमांकावर असून, आतापर्यंत जिल्ह्यात 1 कोटी 28 लाख 66 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तर, पहिल्या स्थानावर नाशिक जिल्ह्याने बाजी मारली आहे. पुण्याला प्रथम किंवा पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी वृक्ष लागवडीचा वेग वाढविणे आवश्‍यक आहे.

राज्यात जुलैपासून वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात झाली. यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत राज्याने 90.65 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. आजपर्यंत राज्यात 31 कोटी 20 लाख 7 हजार वृक्ष लागवड झाली असून, त्यासाठी 89 लाख 11 हजार 663 वृक्षप्रेमींनी सहभाग घेतला. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत वृक्षलागवडीचे 84.44 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, त्यासाठी 2 लाख 48 हजार वृक्षप्रेमींनी सहभाग घेतला. परंतु, यावेळी पुणे जिल्हा चौथ्या क्रमांकावर असून, नाशिक, नांदेड आणि चंद्रपूर हे जिल्हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पुणे जिल्ह्यापेक्षा नाशिकमध्ये 70 लाख वृक्षलागवडीची संख्या अधिक असून, चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यात केवळ दीड लाख वृक्ष लागवडीचा फरक आहे.

त्यामुळे पुणे जिल्ह्याला अजून वरच्या स्थानावर येण्यासाठी वृक्षलागवडीची गती वाढवावी लागणार आहे. आतापर्यंत तीन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवडीच्या महामहोत्सवात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.