पुणे : महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस कै. रमेश दामले यांचा नववा स्मृतिदिन संस्थेतर्फे मंडळाच्या गुलटेकडी येथील सकल ललीत कलाघर येथे संपन्न झाला. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था क्रीडा व शिक्षण क्षेत्रात गेली नऊ दशके कार्यरत आहे. महाराष्ट्रीय मंडळातील देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या यशस्वी माजी विद्यार्थी, कार्यकर्त्यास रमेश शिवरामपंत दामले यांच्या स्मरणार्थ रमेश दामले स्मृती प्राइड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ , स्मृतीचिन्ह व रुपये दहा हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्कारास उत्तर देताना उमेश झिरपे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या पुरस्कारामुळे घरच्या व्यक्तींनी आपल्या कार्याबद्दल कौतुक केल्यामुळे कृतार्थ झाल्यासारखे वाटले असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले साहसी खेळामुळे आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते हे शालेय जीवनातील हिमालयातील गिर्यारोहण मोहिमेमुळे ठसले आणि जीवनाला कलाटणी मिळाली.
महाराष्ट्रीय मंडळाचे कार्य महान आहे व कामेही खूप विस्तृत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र मंडळातील दिग्गजांनी अनेक जणांना घडविले आहे. महाराष्ट्रीय मंडळाच्या संस्थापकांची खेळाबद्दलची दूरदृष्टी उत्तम होती. क्रीडा, शारीरिक शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेने असंख्य उत्तम विद्यार्थी तयार केले. गिर्यारोहण यासारख्या साहसी उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी मान्य केले.
समारंभाचे प्रमुख पाहुणे पराग करंदीकर यांनी आपल्या भाषणात साहस आणि शौर्य अंगात कसे रुजेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. झिरपे हे केवळ उत्तम गिर्यारोहक नव्हे तर उत्तम माणूस देखील आहेत. अनेक वेळा त्यांना अष्ट हजारी मोहिमांमध्ये अत्युच्च शिखरावर पोहोचण्याची संधी असून देखील त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रथम संधी दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले म्हणाले उमेश झिरपे आकाशातील गवसणी घालणारे तरीही पाय जमिनीवर असलेले व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महाराष्ट्रीय मंडळाच्या कार्याची ओळख संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले यांनी करून दिली. सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. याप्रसंगी मल्लखांब जिम्नॅस्टिक आणि योगासनांची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.