पुणे – राज्यात पुन्हा कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असे असताना सुद्धा काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचे दिसून आले. एवढंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये राज ठाकरे पुन्हा विना मास्क दिसून आले होते. तसेच यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना ‘मास्क काढा’ अशा सूचनाही दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला होता.
मात्र यावेळी विना मास्क दिसणारे राज ठाकरेंनी चक्क मास्क घातला होता. मराठी वृत्तवाहिनी टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पुणे दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( बळवंत मोरेश्वर पुरंदरे )यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी मास्क घातलेला असून यावेळीचे दृश्य सध्या व्हायरल होत आहे.’
पुणे येथील संपूर्ण दौरा राज ठाकरे यांनी विनामास्क केला मात्र पुरंदरे यांच्या भेटीदरम्यान मास्क घालून बसले होते. या भेटीत त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.