पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारल्याची घटना ताजे असतानाच मंगळवारी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात चक्क नोटांचा (पैशांचा) पाऊस पडला. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने झेडपीच्या नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आतील बाजूस असलेल्या एका मोकळ्या जागेत नोटा उधळल्या. या घटनेने जिल्हा परिषद मुख्यालयात मोठी खळबळ उडाली.
मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा हा कर्मचारी असून, अनिल शिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या नोटा उधळत असताना संबंधित कर्मचाऱ्याने स्वतःच्या गळ्यातही नोटांचा हार घातला होता. उधळण्यात आलेल्या दहा आणि वीस रुपयांच्या नोटांची संख्या लक्षणीय होती. नोटा उधळल्यानंतर काही काळ शिरसाट हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. दरम्यान, दुपारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवाज्येष्ठता यादीत ३४ वा क्रमांक आहे. मात्र, या सन २०२१-२२ या नोकर भरती वर्षात अन्याय झाल्याचा आरोप शिरसाट यांनी आंदोलन करताना केला आहे.
दरम्यान, नियम डावलून नोकरी भरती करता येत नाही. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आरोपात काही तथ्य नाही, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.