पुणे – पुणे रेल्वे स्थानकातील गर्दी… अचानक बेवारस बॅग… रेल्वे सुरक्षा दलाची धावपळ… एनडीआरएफचे पथक दाखल… परिसर निर्मनुष्य… बॅगची तपासणी… बॉम्बचा संशय…. हे सारे नाट्य घडले सकाळी साडेदहाच्या सुमारास… अन् नंतर रेस्क्यू ऑपरेशन…
रेल्वे स्थानकात शुक्रवारी नेहमीप्रमाणे प्रवाशांची ये-जा सुरू होती. स्थानकाच बेवारस बॅग आढळली. त्यात संशयास्पद वसतू असल्याचे जाणवले. रेल्वे सुरक्षा दलाने एनडीआरएफला पाचारण केले. काही वेळातच सुदाम बारे, ए.के. जेना यांच्यासह एकूण 28 जणांचे पथक त्याठिकाणी दाखल झाले.
त्यानंतर अचानक आरक्षण कक्षाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडींग केले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि पुणे पोलिसांसह अन्य काही पथकांनी स्थानकाचा परिसर निर्मनुष्य केला.
ही सगळी धावपळ पाहताच ती पाहण्यासाठी क्षणातच बघ्यांची भली मोठी गर्दी जमा झाली. या पथकांकडून रेल्वे स्थानकाची तपासणी केली. बॉम्ब शोध पथकाने एस्केलेटरसह विविध वस्तुंची मेटल डिटेक्टरद्वारे पाहणी केली. त्यावेळी एका बॅगेत काही “रेडीओलॉजिकल’ घटक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर काही वेळातच हे घटक निकामी केले. त्यानंतर परिसरात “जखमी’ झालेल्यांना पथकाच्या कर्मचाऱ्यांनी प्रभावित क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी हलवले.
असा थरार शुक्रवारी स्थानकाच्या आवारातील गर्दीने अनुुभवला. विविध पथकांकडून सुरू असणारे रेस्क्यु ऑपरेशन आणि गंभीर परिस्थिती पाहून प्रवाशांमध्ये कुजबुज सुरू झाली. काही मिनिटांनंतर हे “मॉक ड्रील’ असल्याचे समजल्यानंतर प्रवासी, बघे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रवाशांची सुरक्षितता आणि जनजागृतीच्या दृष्टीने “मॉक ड्रील’ केल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.