पुणे – रेल्वे मंत्रालयाने “स्वच्छ भारत’ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मध्य रेल्वेने आपला ठसा उमटवला आहे. मध्य रेल्वे अंतर्गत असणाऱ्या पुणे स्थानकाने चौथ्या क्रमांकावर, तर पहिले तीन क्रमांक अनुक्रमे सुरत, दादर आणि सिकंदराबाद यांनी पटकावले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पर्यावरण आणि हाउसकिपिंग (स्वच्छतागृह आणि स्थानकावरील स्वच्छता) या प्रमुख बाबींवर हे सर्वेक्षण झाले होते. यामध्ये स्थानकाच्या आवारातील स्वच्छता आणि चांगल्या पर्यावरणासाठी करण्यात आलेल्या स्थानकांवरील प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने स्थानकांवर सर्वेक्षण झाले.
ज्या स्थानकांचे उत्पन्न 500 कोटींपेक्षा जास्त आहे आणि 20 मिलियनपेक्षा अधिक प्रवासी ये-जा करतात अशा “नॉन सबअर्बन’ (एनएसजी 1) प्रवर्गात मध्य रेल्वेच्या 21 स्थानकांचा समावेश आहे. तर दादर स्थानक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर “एसजी’ प्रवर्गात मध्य रेल्वेच्या सहाव्या क्रमांकावर करी रोड, सातव्या क्रमांकावर डोंबिवली, तर आठव्या क्रमांकावर किंग सर्कल या स्थानकांचा “टॉप 10′ मध्ये समावेश आहे, असे प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले.