पुणे(प्रतिनिधी) – लॉकडाऊन 4 मध्ये सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्र देखील सुरू केल्या आहेत. या अंतर्गत पुणे स्थानकातील तीन खिडक्यांचे कामकाज सुरू झाले आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
1 जूनपासून धावणाऱ्या गाड्यांच्या अनुषंगाने प्रशासनाने यापूर्वी प्रवाशांना केवळ ऑनलाईन तिकीट बुक करण्याचा पर्याय खुला करून दिला होता. मात्र आता स्थानकांवरील आरक्षण खिडक्या सुरू करण्याचे आदेश मंत्रालयाने रेल्वेच्या विभागीय कार्यालयांना दिले आहेत. येत्या काळात या खिडक्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागातील पुणे स्टेशनसह चिंचवड, तळेगाव, बारामती, सातारा, कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड या स्थानकांवरील प्रत्येकी एक खिडकी सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना 1 जूनपासून सुरू होणाऱ्या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.
25 तारखेपासून मिळणार परतावा…
22 मार्चपासून रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांच्या तिकीटांची रक्कम परत देण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. 25 मेपासून प्रवाशांना या खिडक्यांवर रद्द झालेल्या तिकीटांचा परतावा देखील मिळणार आहे. प्रवासाच्या दिनांकापासून पुढील 6 महिन्यामध्ये प्रवासी हा परतावा घेऊ शकणार आहेत. परतावा मिळण्यासाठी पुरेसा वेळ असल्याने प्रवाशांनी स्थानकावर गर्दी न करण्याचे प्रशासनाने केले आहे.
सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक….
तिकीट खिडक्यांच्या आवारामध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशनच्या परिसरातील तिकीट खिडक्यांसमोर प्रशासनाकडून विशिष्ठ अंतर ठेवून चौकोनांची आखणी करण्यात आली आहे.