तासन्तास कोंडीने वाहनचालक हैराण
मांजरी (प्रतिनिधी) – मांजरी बुद्रुक येथील रेल्वे गेट क्रमांक तीन हे उड्डाणपुलाच्या कामासाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे साडेसतरानळी रेल्वे गेटवरून पर्यायी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, रेल्वे गेटच्या दोन्हीही बाजूला अरुंद रस्ता आहे. त्यात आता वाहतुकीत वाढ झाल्याने येथे कोंडी होऊ लागली आहे. अशीच अवस्था मांजरी बुद्रुक- भापकरमळा या पर्यायी रस्त्यांवर होत आहे.
मांजरी रेल्वे गेट मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळवताना आवश्यक तो बदल करणे गरजेचे होते. पण, साडेसतरा नळी येथील अरुंद रस्त्यावर मोठी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे एकावेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास कोंडी होत आहे. याशिवाय रेल्वेगड्यांना ये-जा करताना गेट बंद करून उघडल्यानंतर पुन्हा येथे वाहतूक कोंडी होत आहे.
अरुंद रस्ता, रस्त्यात झाडांचा अडथळा, वळणाच्या भागावर नागरिकांनी टाकलेले दगड यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच साइड पट्टया नसल्याने वाहने शेजारील शेत-मातीत अडकून पडत आहेत. त्यामुळे साडेसतरा नळी या पर्यायी रस्त्यांवर हडपसर व मुंढवा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणसाठी दोन पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.
मोरे वस्तीजवळ काही ठिकाणी हा रस्ता अरुंद आहे. काही ठिकाणी झाडांचा अडथळा ठरत आहे. तर भापकरमळा येथे एक-दोन वळणावर नवीन वाहन चालकांना वळण रस्ता लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात घडत असून वाहतूक कोंडी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी रस्ता दुरुस्ती करून वाहतूक नियमनाचे सूचना फलक लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.