पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावणीसाठी हजर होण्यासाठी न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राहुल गांधी हे लोकसभेच्या अधिवेशनात आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून व्यक्तीशः उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात गांधी यांच्या वकिलांनी केला होता. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे.
गांधी हे विद्यमान खासदार व लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर होते. येथील न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे. मात्र, गांधी दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने हजर राहू शकत नाहीत, असे अॅड. पवार यांनी दाखल केलेल्या अर्जात नमूद होते. त्यावर सुनावणी घेऊन १० जानेवारीला गांधी यांना न्यायालयात हजर ठेवावे, असा आदेश ॲड. पवार यांना दिला आहे.
हजर झाले नाही म्हणून शिक्षा व्हावी
गांधी सोमवारी (ता. २) तारखेला न्यायालयात हजर झाले नाहीत म्हणून त्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे, तसेच ते समन्स मिळाल्यानंतरही हजर न झाल्याने त्यांना भारतीय दंड संहितेतील कलम १७४ तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व्हावी, असा अर्ज सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केला आहे.
तोपर्यंत सावरकरांवर टीका नको
गांधी यांनी एका भाषणात पुन्हा सावरकर यांची बदनामीकारक वक्तव्य केले, असे ॲड. कोल्हाटकर यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने ॲड. पवार यांना सूचित केले की, जोपर्यंत या दाव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका करू नये, असे त्यांना सांगावे. पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे.