पुण्याचे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार का?

पुणे – पुण्याच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या गुरुवारी (दि.12) आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर चर्चा होऊन त्यास या बैठकीच्या निमित्ताने गती मिळण्याची शक्‍यता आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशानाच्या माध्यमातून आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात. मात्र, सर्वांनाच संधी मिळत नाही. त्यामुळे आमदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्वच आमदारांची एकत्र बैठक येत्या गुरुवारी बोलावली आहे.

विधान भवनात ही बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्री आमदारांचे प्रश्‍न आणि समस्या जाणून घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त या बैठकीला उपस्थित राहतील.

या बैठकीत प्रामुख्याने पुरंदर विमानतळ, मेट्रोचे विस्तारित मार्ग, रखडलेली भामा आसखेड पाणी योजना, जुन्या वाड्यांच्या पुनर्वसनासाठी रखडलेली क्‍लस्टर पॉलिसी, संपूर्ण राज्यासाठीची विकास नियंत्रण नियमावली, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, शहरातील पाणी टंचाई अशा विविध महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा होईल.

पुण्यासाठी निधी कमी पडणार नाही : उपमुख्यमंत्री
पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्रमांक 26 येथील 4.5 किलोमीटर 500 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि श्री गुरुनानक देवजी उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते. पुण्यातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदींसाठी निधी देण्यात येत असून जागतिक दर्जाचा चित्रपट महोत्सव होण्यासाठीही सहकार्य करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले.

शहरातील विविध प्रश्‍नांबाबत बैठक घेण्याची मागणी आमदारांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यात शहराचे विविध प्रश्‍न मांडणार आहोत.
– सुनील टिंगरे, आमदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.