पुणे – शहर-उपनगरांत मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. पाऊस ओसरताच मोठ्या प्रमाणात वाहन चालक रस्त्यावर आले. पण, पाण्यातून वाट काढताना त्यांची त्रेधा उडत होती. वेगही मंदावला होता. तुंबलेले पाणी, रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या, बंद सिग्नल यंत्रणा आणि हतबल पोलिसांमुळे कोंडीत आणखी भर पडली.
पावसामुळे दुचाकीस्वारांनी रस्त्याकडेला आडोसा शोधला. मात्र, जोर कमी होताच त्यांनी रस्त्यावर धाव घेतली. यातच पावसामुळे चारचाकी वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली. अगोदरच शहरात ठिकठिकाणी रस्ते तुंबल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने सुरु होती. अतिरीक्त वाहनांची भर पडल्यावर मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यातच एकमेकापुढे जाण्यासाठी वाहन चालक जागा दिसेल तेथून मार्ग काढत होते. यामुळे काही वेळातच गल्ली बोळेही वाहतूक कोंडीने जाम झाली होती.
पाऊस ओसरल्यावर वाहतूक पोलीस चौकात आले. मात्र, तोवर मुख्य चौकाबरोबर गल्लीबोळेही जाम झाली होती. यामुळे वाहतुकीचे नियंत्रण त्यांच्या हाताबाहेर गेले होते. गर्दीत अडकल्याने तसेच कुठेही कशीही वाहने आणली गेल्याने ठिकठिकाणी नागरिकांचे वाद होत होते. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संयम सुटला होता.
यातच पाण्याचा निचरा होत नसल्याने दुचाकी चालकांना फुटभर पाण्यात थांबावे लागले होते. वाहन चालकांकडून वाहतूक पोलीसांबद्दल प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता. इतर वेळी चौकात घोळक्याने दिसणारे वाहतूक पोलीस कुठेच दिसत नव्हते.
सर्वच मार्ग ठप्प
शहरातील डेक्कन, लष्कर , पाषाण, बाणेर, औंध, कोथरुड, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजीनगर, कोथरुड, लोहगाव, धायरी येथे प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी पोलिसांच्या मदतीला स्थानिक नागरिक धाऊन आले होते. मात्र, कोंडी फुटत नव्हती. चांदणी चौक, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कात्रज-बंगळुरू या महामार्गांवरही प्रचंड कोंडी झाली होती. वाहतूक नियंत्रण आणि पोलीस नियंत्रण कक्षालाही वाहतूक कोंडीचे अनेक फोन येत होते.
रिक्षा मिळण्यास अडचण
पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे रिक्षा चालक प्रवाशांना नकार देत होते. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत होती. अॅपवरुनही रिक्षा मिळत नव्हत्या. पावसाचा जोर कमी झाल्यावरही कोंडीमुळे रिक्षाचालक नकार देत होते. यामुळे नागरिकांना घराकडे जाण्यास अडचण येत होती.