पुणे -रेमेडेसिविरच्या इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन नामांकित सराफी व्यावसायिक पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या वतीने महापालिका रुग्णालयांतील करोना बाधितांसाठी “सीएसआर’अंतर्गत सुमारे 600 रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील आठवड्यात स्थायी समितीने 800 इंजेक्शनची खरेदी केली होती. त्यानंतर आता ही 600 इंजेक्शन मिळाल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. सुमारे 16 लाख रुपयांची ही मदत आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सुनीता वाडेकर, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, नगरसेवक दीपक पोटे यावेळी उपस्थित होते. या वेळी महापौरांच्या हस्ते सौरभ गाडगीळ यांना “सीएसआर’चे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शहरावर असलेल्या संकटकाळात या इंजेक्शनमुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे रासने यावेळी म्हणाले.
शहरात करोनाचे संकट गंभीर आहे. अशा स्थितीत ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका चांगले काम करत असून, यात सहकार्य करता आले याचा आम्हांला विशेष आनंद आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.
– सौरभ गाडगीळ, पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स