पुणे – हवामान विभागाकडून शहर आणि परिसरात पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून शहरातील आयटी कंपन्या आणि खासगी अस्थापनांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी सुविधा द्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेकडून शहरातील शाळांना एक दिवसाची सुट्टीही जाहीर केलेली आहे.
शहरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळाधार पाऊस सुरू आहे. 11 जुलै पर्यंत हा पवासाचा इशारा देण्यात आला होता, त्यानंतर हवामान विभागाने आता 15 जुलै पर्यंत मुसळाधार पाऊस राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, शहरात खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले असतानाच आता खासगी अस्थापना तसेच आयटी कंपन्यांनाही महापालिकेने वर्क फ्रॉम होमसाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती केली आहे.
शहरात पावसामुळे वाहतूककोंडी होत आहेच, शिवाय, मुठा नदीतही मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या शिवाय, पावसामुळे शहरात मोठया प्रमाणात झाडपडीच्या घटनाही घडत आहेत. अशा स्थिती संभाव्य धोके टाळण्यासाठी महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आले आहे.