कोथरूड – येथील दिलजीत दोसांझ याच्या व्यावसायिक कार्यक्रमामुळे कोथरूडमधील वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडेल. सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच कर्णकर्कश आवाजामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या कार्यक्रमाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी भूमिका कोथरूडमधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतली.
मात्र, तरीही कार्यक्रम होत असल्यामुळे संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
या वेळी अध्यक्ष विजय बाबर, आशिष शिंदे, लखन सौदागर, अरविंद वालेकर, रोहिदास जोशी, प्रकाश नलावडे, मोहित बराटे, संतोष शर्मा, सूरज गायकवाड, लखन तोंडे, कृष्ण लेंगे, केदार सणस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते, तसेच मनसेचे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अमोल शिंदे आणि किरण उभे यांनी कार्यक्रमस्थळाजवळ आंदोलन केले. सकल मातंग समाजाचे अध्यक्ष विजय डाकले यांनीही कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती.
पौड रस्त्यावर वाहनांच्या रांगा
दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांना कोंडी आणि डीजेच्या आवाजामुळे प्रचंड मानसिक त्रास झाला, तर पौड रस्त्यावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा गेल्यामुळे अंतर्गत रस्तेही वाहतूक कोंडीत अडकले. या वेळी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आणि नागरिकांनाही पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास कोंडीत अडकावे लागले.