पुणे – राडारोड्यावर मेट्रोकडून संरक्षित जाळ्या

पुणे – महामेट्रोकडून नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा उलचण्यात आला असून वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मुरमाच्या रस्त्याचा भाग नदीपात्रात वाहून जाऊ नये यासाठी महामेट्रोकडून त्यावर संरक्षित जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. संभाजी उद्यानाच्या मागील बाजूस या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. दरम्यान, नदीपात्रात राडारोडा जाणार नाही या उद्देशाने महामेट्रोकडून या जाळ्या बसविण्यात आल्याची माहिती महामेट्रोच्या वनाज ते धान्य गोदाम मार्गाचे प्रकल्पाचे व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी दिली.

महामेट्रोकडून या मार्गासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते कॉंग्रेस भवनपर्यंत नदीपात्राच्या बाजूने मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गात सुमारे 59 खांब असून त्यांच्या पायाचे काम पूर्ण झालेले आहे. या कामासाठी महामेट्रोकडून नदीपात्रात पाया घेण्यासाठी खोदण्यात आलेली माती टाकून मुरमाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता काम संपेपर्यंत असणार आहे.

दरम्यान, हा रस्ता काम पूर्ण होण्यापूर्वी काढणे शक्‍य नसल्याने महामेट्रोकडून या रस्त्याला नदीपात्राच्या बाजूला संरक्षित जाळ्या बसविल्या आहेत. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यानंतर या रस्त्यासाठी वापरण्यात आलेली माती तसेच मुरमाचा भाग नदीत वाहून जाणार नाही याची खबरदारी महामेट्रोकडून घेण्यात आली आहे. सुरुवातीला सुमारे 100 मीटर भागावर या जाळ्या बसविण्यात आल्या असून उर्वरीत भागावरही पावसाळ्यापूर्वी त्या बसविण्यात येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.