अनेक ठिकाणी अर्टी-शर्तीचे उल्लंघन होत असल्याचा दावा
पुणे – खासगी कोविड केअर सेंटरचे (सीसीसी) महापालिकेने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेंटर सुरू करताना दक्षता घेण्यासंदर्भातील ज्या अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत, त्याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाचही परिमंडळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे काम दिले असून, त्यांनी ऑडिट करून त्याचा अहवाल द्यायचा आहे. मुंबई येथील कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील खाजगी कोविड केअर सेंटर सुरू करताना महापालिकेने काही परवानगी बंधनकारक केले आहे; त्यानुसार शहरात सुरू असलेल्या सर्व खाजगी “सीसीसी’चे ऑडिट करण्याचे आदेश विभागीय वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिली.
खाजगी सीसीसीची जागा अर्जदाराची स्वत:ची आहे की भाडेतत्त्वावर, जागा भाडेतत्वावर असल्यास नोंदणीकृत भाडेकरार, कोविड केअर सेंटरच्या इमारतीचे महापालिका बांधकाम विभागाचे भोगवटा पत्र, हॉटेल-लॉजिंग/वसतीगृह असल्यास त्याचा पुणे महापालिका आरोग्य विभागाची परवानगी, अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र, पोलीस विभागाचा कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचे ना हरकत पत्र, भाड्याने घेतलेली जागा असेल तर जागा मालकाचे संमतीपत्र या 7 कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
खाजगी कोविड केअर सेंटरचे ऑडिट करताना महापालिकेकडून, संबंधित कोविड केअर सेंटरमधील जबाबदार डॉक्टरांचे रुग्ण देखरेखीबाबतचे संमतीपत्र घेण्यात येणार आहे तसेच त्यासोबतच संबंधित डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षणाची प्रमाणपत्रे आणि संबंधित कौन्सिलकडील अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्रही तपासण्यात येणार आहे.
– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा